Sunday, May 8, 2011

गदिमा

चंद्रभारल्या जीवाला, नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता, मी तो भारलेले झाड !

गीतरामायणाविषयीच्या आपल्या मनोगतातील गदिमांचे हे शब्द त्यांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेची साक्ष देतात. या भारलेल्या झाडानी मराठी मनांवर अनेक वर्ष अक्षरशः गारुड केल.ग.दि.माडगुळकर हे नाव ऐकल्यावर कौतुकादरानी उसळुन न येणार मराठी मन क्वचितच असेल. साहित्याच्या क्षेत्रात कथा, लघुकथा, प्रवासवर्णन, भाषांतरीत साहित्य, बालवाङमय, कादंबरी, गीतरामायण, कविता,काव्यकथा,संगितिका आणी चित्रपटाच्या क्षेत्रात चित्रपटगीत, कथा, पटकथा, संवाद, अभिनय अशी मुशाफिरी पाहिली की थक्क व्हायला होत.

बाबुजी - सुधीर फडके आणी गदिमा ही मराठी भावसंगितातील दोन उत्तुंग शिखर. शब्दसुरांच्या या सुवर्णयोगातुन अनेक भावमधुर गाणी आणि गीतरामायणासारखी अजरामर कलाकृती निर्माण झाली. 'विठ्ठला तु वेडा कुंभार...', 'जग हे बंदिशाळा...','नसे राऊळी वा नसे मंदिरी...','संथ वाहते कृष्णामाई..','सांग तु माझा होशील का...','या चिमण्यांनो परत फिरा रे...' या सारख्या असंख्य गीतांनी मराठी रसिकांना वेड लावल.

साधे, सोपे पण अतिशय अर्थगर्भ आणि नादमय शब्द ही या कविची ताकद होती. असामान्य शब्दप्रतिभेच देण लाभलेल्या या महाकविसमोर शब्द हात जोडुन उभे रहात.अशा शब्दांमधे विलक्षण ताकद असते. चिरंजिवित्वाच वरदान लाभलेल्या या शब्दांनी गदिमांची अनेक गीत अजरामर झाली. गदिमांच्याच शब्दात सांगायच झाल तर,

झंकारल्या कंठवीणा आले चांदण्याल सुर
भावमाधुर्याला आला महाराष्ट्रीय महापूर !

चला तर मग या भावमाधुर्याचा आस्वद घेत महाराष्ट्राच लेण असलेल्या या महाकविचं स्मरण करुयात.

No comments:

Post a Comment