Sunday, May 8, 2011

चैत्रपाडवा

चैत्रपाडवा ! शिशिराची शेवट सांगत वसंताची चाहुल देणारा. हजारो वर्षांपुर्वी पृथ्वीचा आस कलला आणी या ऋतुचक्राच्या चलतचित्राला पृथ्वीच्या विशाल मंचावर सुरुवात झाली. शिशिराच्या पानगळीतुन सृजनाचा हुंकार देणारी चैत्रपालवी. फुलांच्या सुगंधानी, सपर्ण वृक्षांच्या सळसळींनी जिवंत होऊन उठलेली, तापल्या उन्हाच्या वैषाखवणव्यातुन पावसाची आस लागलेली सृष्टी. या सृजननाट्याच्या उद् घोषात येतो गुढीपाडवा !

पाडव्याला उभारलेली गुढी प्रभु रामचंद्रांच्या वनवासाचा शेवट, नववर्षाची सुरवात, चंद्रगुप्त विक्रमादित्यादी सम्राटांनी शकांवर प्राप्त केलेला विजय अश्या गोष्टींच प्रतीक आहे. गुढीवरील आंब्याची कोवळी डहाळी ही वसंत ऋतुच्या आगमनाची नांदी आहे. कडुलिंबाचा कडवट पाला वर्षारंभीच चाखुन रोजच्या धकाधकीत सामोरा येणारा कडवटपणा पचवण्याचा संदेश गुढी देते.

निसर्गाचा सृजनोत्सव, नव्याची सुरवात, होळीचे रंग आणी वाईटावरील विजयाच प्रतीक असणारा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणी भरभराट घेऊन येवो !

No comments:

Post a Comment