जी. ए. कुलकर्णींच्या पत्रांचा संग्रह (खंड १) वाचताना ( आणी त्यांच्या इंग्रजी साहित्याच्या व्यासंगाने पावलोपावली थक्क होताना..) Balzac या फ्रेंच नाटककार आणी कादंबरीकाराचा उल्लेख आला. जी. एं, ना फारसा न आवडणारा हा लेखक. पण त्याची एक कथा मात्र त्यांनी या पुस्तकात दिली आहे. ती वाचताक्षणी आवडुन गेली. ही कथा जी.एं. च्याच शब्दात जशीच्यातशी-
" एकदा जहाजातुन अनेक प्रवासी चालले होते.पण अचानक वादळ येऊन ते खडकावर आदळले. त्यानंतर किंकाळ्या ऐकु आल्या. सार्यांनी जिवाची आशा सोडुन प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. त्या वेळी एक चमत्कार घडला.भव्य दाढी असलेला एक तेजस्वी पुरुष त्यांच्यासमोर प्रकट झाला व म्हणाला, "मी तुम्हाला तारायला आलो आहे.माझ्या मागुन या." असे बोलुन तो पाण्यावर सहजपणे चालत किनार्याकडे गेला. सारे प्रवासी दॄष्टांताने भारुन त्याच्यामागे निघाले. त्यांनाही पाण्यावर चालण्याची शक्ती मिळाली, व ते देखील सुखरुपपणे किनार्याला लागले.पण कोंबडीच्या काळ्या पिलांत मध्येच एखादे पांढरे, sport पिलु असावे त्याप्रमाणे या घोळक्यात एक एकांडा माणुस निघाला. तो म्हणजे जहाजाचा कप्तान.त्याने किंकाळी फोडली नाही, गुडघे टेकुन प्रार्थना केली नाही, की तो त्या भव्य पुरुषामागुन भाविकतेने निघाला नाही. त्याने फुटलेल्या जहाजाच्या दोनतीन फळ्या घेतल्या व त्यांच्यावर तरंगत तो पोहत किनार्याकडे आला.तेव्हा त्या भव्य पुरुषाने त्याच्या खांद्यावर टिचकी मारली व म्हटले," मला तुझ्याशी बोलायच आहे." थोड्या बाजुला जाऊन तो कप्तानाला म्हणाला," हे बघ, हे सारं ठीक आहे; पण पुन्हा असा उपद्व्याप करु नको. तुझ उदाहरण पाहुन आणखी काही लोक बिघडतील. मग आमच्यासारख्यांचा अवतारच संपेल. स्वतःच्या सामर्थ्या विषयी त्यांचं अज्ञान हे तर आमचं सामर्थ्य, तेव्हा यापुढे जादा शहाणपण दाखवत जाऊ नकोस !" "
(स्त्रोतः जी.एं.ची निवडक पत्रे- खंड १, संपादन म.द. हातकणंगलेकर, श्री.पु.भागवत)
No comments:
Post a Comment